शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

 ये वाया नको घालू

शिर्षक = ये वाया नको घालू...
आजना दिन मन्हा से
ये नको घालू वाया...
दिन से भलताच कामना
दिन जावावर कोनीच राहत नही साया...!!

कठिन टाईम देखात दिनले
कोणीच व्हत नही सादर...
आजना दिन मन्हा से
समजीसन व्हढीले येसनी चादर...!!

येन कर सोन चमकिसन उठ 
ध्यानमा ठिसन लाग जिदले..
आजना दिन मन्हा से
नको ये वाया घालू हट्टाले...!!

आजना दिन मन्हा से
समजीसन काम कर इमादारीन...
दि देवबा आशिर्वाद 
फय दि तूले तूना कर्मान...!!

कालदिसना दिन सरेल र्‍हास 
तो नविथीन परत येत नही...
आजना दिन म्हना से
मांगे फिरी देख नही ते फिरसी दिशा दाही...!!

कोनीच कोन नही या जगमा
नही लेनार तूनी कोन हमीले...
आजना दिन म्हना से
आनभव मी सांगस कोन येत नही कामले...!!

✍️पिएसआय विनोद बी.सोनवणे लंघाणेकर 
     ह.मु.अमळनेर जि.जळगाव 
     दिनांक =२७-०४-२०२३

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

आला आला उन्हाळा आता तब्येत सांभाळा 

"आला आला उन्हाळा, आता तब्येत सांभाळा " उन्हाळा म्हटले की नुसते कडक ऊन, वातावरण अगदी रुक्ष,जमीन कोरडी,पाण्यासाठी आसुसलेली, कुठेही मन लागत नाही. सगळीकडे अगदी कडक, चमकणारा सूर्यप्रकाश, डोळ्यांनाही नकोसे व शरीरासह मनासही नको वाटणारे असे ऊन..व तीच परिस्थिती शरीरातही (( जे पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने )) 

यांमध्येच जर आपण अगदी 'थंडगार माठातील पाणी' असे जरी उच्चारले तरीही शरीर व मनास आल्हाददायक, तृप्त झाल्यासारखे वाटते... 

उन्हाळ्यात शरीरास पाण्याची आवश्यकता अधिक भासते त्यासाठी वेगवेगळी थंड व आरोग्यदायी पेय जी आपल्याला उन्हाळ्यात उपयुक्त ठरतील. 

1) थंड पाणी - (फ्रीजमधील थंड पाणी नको) माठातील थंड पाणी घ्यावे. माठातील पाण्यात जर वाळा (उशीर) या नावाची आयुर्वेदीक वनस्पती टाकली व ते पाणी नित्य नियमाने पिले तर पित्ताचे त्रास जसे की लघवीची जळजळ, हातापायांची जळजळ, डोळ्यांची जळजळ यांचा त्रास होणार नाही. उकळून थंड केलेले पाणी पचण्यासाठी हलके असते. उकळून थंड केलेले पाणी जास्त वेळ ठेऊ नये व दुसर्‍या दिवशी पिऊ पण नये त्यासाठी आजच्या एका दिवसापुरतेच पाणी उकळून घ्यावे. दुसर्‍या दिवशी नवीन दुसरे पाणी वापरावे. 

2) ताजे गोड लिंबू सरबत- 

उन्हाळ्यात लिंबू सरबत भरपूर प्रमाणात घ्यावे. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी व इलेक्ट्रोलाइट्स चा समतोल नीट राहण्यास मदत होते. शरीरातील उष्णता कमी करते. लिंबामध्ये Vitamin C भरपूर प्रमाणात असते. 

3) नारळ पाणी - 

नारळ पाणी गोड असून ते तहान कमी करण्यास मदत करते. पचण्यास हलके, थंड, आल्हाददायक व भरपूर प्रमाणात लघवी होण्यास मदत करते. 

4) कैरीचे पन्हे - 

कैरीचे पन्हे अवश्य घ्यावे याने दाह/जळजळ कमी होते. तोंडास चव येते व पचनासही मदत करते. 

5) कोकम सरबत - 

यास 'आमसूल' असेही म्हणतात. स्वयंपाकात चिंचेऐवजी याचा वापर करावा. याच्या फळांचे सरबत तहान कमी करते. ज्यांना पित्तामुळे अंगावर गांधी उठणे इ. त्रास असतात त्यांनी हे अवश्य घ्यावे. 

6) धन्याचे पाणी - 

10 ग्रॅ थोडेसे कुटलेले धने व 60 मिली पाणी रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी ते थोडे हाताने कुस्करून घेऊन पाणी गाळून प्यावे. त्यात थोडी खडीसाखर घालून घेतले तरी चालेल. (मधुमेही वर्ज्य) याने लघवीची आग कमी होते. शरीरातील उष्णता लघवीवाटे बाहेर पडते. 

7) वाळ्याचे सरबत- 

अति प्रमाणात व दुर्गंधी युक्त घामाचे प्रमाण कमी करते. 

8) आवळा सरबत- सर्व पित्तामुळे होणार्‍या त्रासासाठी उपयुक्त, शरीरातील उष्णता कमी करते. आवळ्यात Vitamin C भरपूर प्रमाणात असते. 

9) ताजा ऊसाचा रस- 

ऊसाचा रस थंड, बलकारक आहे. परंतु ऊसाचा रस पिताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे ऊसाचा रस नेहमी ताजा व बर्फ रहित घ्यावा. शिळा ऊसाचा रस घेऊ नये. 

9) ताजे गोड ताक - 

ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृतच !! ताक पचण्यास हलके, भूक वाढवणारे,रुचीकर, चव देणारे आहे. आंबट ताक घेऊ नये. 

साधारणपणे इत्यादी पेय शरीरास थंडावा देण्याकरिता वापरु शकतो. याचा उपयोग नक्की करावा. 

इतर हवाबंद थंड पेय यांचा वापर शक्यतो टाळावा...... 

चला तर मग खूश राहा,आनंदी राहा, आणि निरोगी राहा.... 

धन्यवाद 🙏🙏 

🖋📗डॉ.शितल यादव-पाटील व डॉ. बालाजी पाटील 

श्री विश्वइंदु आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, आरोग्य नगर, उमरगा.


सोमवार, १७ एप्रिल, २०२३

गांधी नेहरू विरुद्ध आंबेडकर कोण जिंकलं कोण हारलं?

👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻
   गांधी नेहरू विरुद्ध आंबेडकर
     कोण जिंकलं कोण हारलं?
  ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
        गांधी आणि आंबेडकर यांच्यात पहिला खटका सप्टेंबर ते डिसेम्बर 1931 ला लंडन येथे पार पडलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत उडाला. या परिषदेत सुरवातीलाचं गांधीजींनी भाषणात सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस हीं सर्व भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करते. त्या नंतर गांधीजींच्या या वाक्यावर तीन घटकनी आक्षेप घेतला. त्यात जिनानी सांगितले की, मुस्लिम लीग अल्पसंख्यांक मुस्लिमांसाठी काम करीत आहे. आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत. संस्थानीकांच्या संघटनेने दावा केला की, आमच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाच प्रतिनिधित्व आम्ही करतो. त्या प्रदेशाचा काँग्रेसशी काही संबंध नाही. तर डॉ भीमरावं आंबेडकर यांनी सांगितले की, काँग्रेस फक्त उच्चं जातीच्या लोकांसाठी काम करते. दलितांचं प्रतिनिधित्व मी करतो. म्हणून दलित वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो आहे. त्यामुळे कुठलाही ठोस निर्णय न घेता हीं परिषद पार पडली.
        दुसरा प्रसंग होता लोकप्रतिनिधी गृहात दलितांच्या योग्य प्रतिनिधित्वा संबंधिचा संघर्ष गांधी आंबेडकर यांच्यात उभा राहिला. दलितांसाठी आंबेडकंरांना पृथक मतदारसंघ हवे होते तर गांधीना संयुक्त मतदार संघ हवे होते. पृथक मतदार संघात कोणावरही अन्याय नं होता दलित वर्गासाठी त्यांचं हित जपणारे आमदार खासदार निवडून आणता येत होते. तर संयुक्त राखीव मतदार संघात. Sc वर्ग जेमतेंम 20% पेक्षाही कमी आणि ईतर 80% पेक्षा जास्त मतदार येतात. म्हणजे उमेदवार फक्त दलित पण मतदार ईतर सर्व तें दलित हिताचा उमेदवार निवडून देऊचं शकत नाहीत. शिवाय sc किंवा st राखीव मतदार संघात इतरांना निवडणूक लढाविता येत नाही. म्हणजे हां त्यांच्यावर अन्याय आहे. असा अन्याय बाबासाहेबानी ठरविलेल्या मतदान पद्धतीत नव्हता. पण गांधीजीनी हट्ट केला बाबासाहेबहीं माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी गांधीजीनी आमरण उपोषण सुरु केले. त्यातून काही अनर्थ घडू नये म्हणून मग बाबासाहेबाना माघार घ्यावी लागली. इथे वरवर बाबासाहेब हरले आणि गांधी जिंकले अस वाटत असलं तरी, न्याय हरला आणि अन्याय जिंकला हे खरं आहे. तों पुणे करार  24 सप्टेंबर 1932 ला झाला. त्या करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू आले होते असं म्हणतात. मला आजही वाटते की, sc st वर्ग आणि ईतर प्रवर्ग तिघांवरहीं अन्याय करणारा पुणे करार आहे. राजकारणातील आरक्षण अजून लांबणार असेल तर पुणे करार रद्द करून बाबासाहेब आंबेडकर यांनी राखीव मतदार संघाचा जो मूळ मसुदा तयार केला होता तों लागू करावा. तों पुणे करार काय आहे तें बघू पुढच्या भागात. 
क्रमश:
👴🏻👨🏻‍🎓🙏🏻🎓🤴🏻 बापू हटकर
👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻

त्रिकाल सत्य आणि कधी कालबाह्य न ठरणारा बाबासाहेबांचा विचार

🎓📚🎓📚🎓📚🎓📚
त्रिकाल सत्य आणि कधी कालबाह्य
  न ठरणारा बाबासाहेबांचा विचार!
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
             खरं तर हां लेख मी 14 एप्रिलसाठी लिहिला होता. पण 14 एप्रिलला सोशल मीडिया वर बाबासाहेब यांना अभिवादनं करणारे खूप संदेश असल्यामुळे हां लेख आता रात्री पाठवत आहे. 
*शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.*  
        तुमची बाजू सत्याची असेल आणि तुमच्या हातात कोणतीहीं साधन नसतील तर तुम्हाला तुमच्यावरील अन्याय निवांरण करण्यासाठी दिलेला महामंत्र आहे हां *शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा!*
        तुम्ही दुबळे आहात अन्याय करणारा प्रबळ आहे, तुमची बाजू खरी आहे, तर तुम्हाला न्यायासाठी त्याच्याशी संघर्ष करावाच लागेल. पण आलं मनात आणि उठले सुटले केला संघर्ष असं चालणार नाही. तस केलं तर ज्याच्याशी संघर्ष करायचा तों प्रबळ असेल त्यामुळे तों तुम्हाला संपवून टाकेल. म्हणून मग तुम्हाला समविचारी लोकांचे संघटन उभ करावं लागेल. पण अशिक्षित अनाडी लोकांचं संघटन करून चालणार नाही. अशी माणसं एकत्र केली तर ते संघटन होणार नाही, ती टोळी होईल. हीं अशिक्षितांची टोळी, स्वतःवरी अन्याय दूर करण्या पेक्षा इतरांवर अन्याय करत सुटतील. संख्या बळाच्या आडदांड पणाच्या जोरावर ते लुटालूट करतील. म्हणून हीं सर्व मंडळी सुशिक्षित असावी. त्यासाठी सर्वात आधी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. इतरांना सुशिक्षित केलं पाहिजे. मग या सुशिक्षित लोकांचे संघटन करावं, अशा सुशिक्षिततांच्या संघटनेच्या माध्यमातून संघर्ष केला पाहिजे. तुम्ही नक्की जिंकाल. विजयी व्हाल. म्हणून *शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा* हा रामबाण उपाय आहे.

*महात्मा गांधी म्हणतात खेड्याकडे चला, डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहरांकडे चला!*

 कोण चूक, कोण बरोबर?
माझ्या मते दोघे बरोबर.
         म गांधीच्या काळातील देश हां कृषी प्रधान भारत होता. भारताची सर्व अर्थ व्यवस्था शेतीवर अवलंबून होती. शेती हीं खेड्यातील लोक करत होते. कृषी प्रधान भारताची अर्थ व्यवस्था 80% शेतीवर अवलंबून असल्यामुळे खेड्याकडे चला हां गांधीजींचा सल्ला योग्य होता. पण त्या खेड्यात दलितांची स्थानं काय होत, याच भान कदाचित गांधीना नसावं किंवा त्याबाबत गांधीजीनी तसा विचार केला नसावा.
         पण बाबासाहेबांच तस नव्हत त्यांना प्रत्येक भारतीया सोबत दलित पीडिताची जास्त काळजी होती. ज्यांनी हजारो वर्ष केवळ अन्याय सहन केला होता त्या लोकांचा बाबासाहेब प्राध्यान्यानें विचार करत होते.
          त्यां दलितांचं खेड्यातील जगण अत्यंत वाईट होतं. गावातील सवर्ण समाज म्हणजे जे अस्पृश्य नाहीत. त्यांच्या पुढे दलितांच्या पिढ्यानं पिढ्या दबून होत्या अशा गावात वर मान करून बोलणं सोडा बघणंहीं शक्य नव्हते. तों बरोबरीच्या नात्यांने गावकऱ्याला राम राम किंवा नमस्कार सुद्धा घालू शकत नव्हता. जोहार मायबाप म्हणत होता. पाणी वरून टाकल जायचं. कोणाला स्पर्श झाला तर विटाळ व्हायचा. आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे स्वतःच असं उत्पन्नाच कोणतही साधन नव्हतं. मोल मजुरी करायची तर त्याला योग्य मोबदला नाही. अशा लोकांनी खेड्यात गुलामा सारखं का रहायचं? उलट शहरगावांत कोणताही पाटील जमीदार, वतनदार दबाव टाकू शकेल अशी परिस्थिती नसते. झोपडपट्टीत एखाद्या छोट्याशा झोपड्यात संसार थाटावा लागेलं पण गावात तरी कुठे एवढ्या माड्या हवेल्या होत्या या लोकांच्या? तिथही झोपडीच या झोपडीतून त्या झोपडी हाच फरक. शिवाय रोजगाराला कमतरता नाही. गुलामीच ओझं नाही. शहरात मुक्त आयुष्य जगता येत म्हणून बाबासाहेब म्हणत होते शहरा कडे चला तेही बरोबर होते.
        त्याकाळातील परिस्थितीचं अशी होती की, महात्मा गांधीजीं जे म्हणत होते ते खेड्याकडे चला हेही बरोबर आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते शहरांकडे चला. दोघेही आपापल्या जागी बरोबर होते.
       पण आता परिस्थिती बदलली आहे. सर्वांचा शहरांकडे जाण्याचा ओढा वाढला आहे. कारण शहरात सर्व प्रकारच्या सुविधा एका जागी उपलब्ध आहेत. शाळा, महाविद्यालये, दवाखानें, स्वछ रस्ते, रोजगार, मनोरंजनाची साधान, वीज, पाणी, गॅस बाजार सर्व सुविधा जागेवर मिळतात. त्यामुळे सर्वत्र शहरी करण वाढत आहे आणि खेडी ओस पडत आहेत. काही लोक शेतीच्या निमित्ताने खेड्यात रहात असले तरी त्यांची शहरातहीं घर आहेत. त्यात सर्व परिवार राहातो आणि कधी तरी हवा पालट करायला वीक एन्ड घालवायला खेड्यातील घरी येतो. इथे बाबासाहेब यांची दूरदृष्टी जिंकली अस वाटत. पुढच्या भागात बघू या गांधी-नेहरू विरुद्ध कोण जिंकलं कोण हरलं!
🎓📚🙏🏻📚🎓 बापू हटकर 
🎓📚🎓📚🎓📚🎓📚

रविवार, १६ एप्रिल, २०२३

अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं

जय मानवताभिमानी!
     
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं;

अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं
यानी समाज,कुटुंबनं पिरेमसौख्य उचाट!।।धृ.।। 

बायको नई र्हास ती नवरानी रेंजमा! 
ना बाप-बेटाबी त्या ईचार-संवादमा! 
जोडे हुईस्नीबी हालावतस नई व्हट! 
आशी झाई नातास्ना दुरावानी गोट! 
आशी कोनामुये यार उनी हाई बिप्पात?
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं..।।१।। 

आक्षी फसवणूकना मेसेज वाचीस्नी
सदा हाणामारीना व्हिडिओ दखीस्नी
प्रत्येकजन घाबरीस्नी अलिप्त, निमूट! 
कोनामुये बरं समाजमा हाई फाटाफूट? 
आशी कोनामुये यार उनी हाई बिप्पात? 
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं!..।।२।। 

शिकामिषे ती मोबाईल कानले लाईस्नी
ल्हेस सुनावा देखी सजनाले बलाईस्नी! 
मायबाप चकित! कुवारीनं देख्ता पोट!
समदास्नी उतारी संस्कृतीले मौतघाट! 
आशी कोनामुये यार उनी हाई बिप्पात? 
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं!..।।३।। 

अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं! 
यानी समाज,कुटुंबनं पिरेमसौख्य उचाट!।।धृ.।। 
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
©️®️गुलाबराव धंजी मोरे,धुळे 
मो. ९४०४१९०४३२
दि. १६. ०४. २०२३

याद तुमले येस हुई …आपली माय नि ते याद तुमलेबी येस हुईयाद येस वो कितली वाटे का बरं चालनी गई…

॥श्री॥

            याद तुमले येस हुई …


आपली माय नि ते याद तुमलेबी येस हुई
याद येस वो कितली वाटे का बरं चालनी गई…

घट्यावर बठेल ती गहू दयता दिससं
घाम गयसं आंगना घट्या तसाज व्हडसं…

मांडीवरनं लेकरू खाले वर वर व्हस
मांडी हालता हालता त्याले झोकाज वाटस …

निजस ते बिनघोर मांडी मायनी ती प्यारी
कष्ट करस माय नी लेकरू निजे बिनघोरी…

रोज दयनं कांडन हरबरा तोर दाय
भरडी कांडी तेल लाई मडकाम्हां भरे माय …

हात पाटलान्या शेवया कुरडाया नि पापड
पोया गुईन्या नरम चुलावर ते खापर …

रशी मायना हातनी लाय गयस आते भी
भज्या लोनिना तो गोया खीर गहूनी चाटू मी..

काय काय याद करो जठे तठे ती दिससं
आजूबाजूले फिरस आज आतेबी वाटसं …

माय जीवना जीवडा माय सुगंधी केवडा
मायना करता बठ्ठासना जीव हुई जास येडा…


प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १६ एप्रिल २०२३
वेळ : दुपारी ३/०३

वाचण्यापेक्षा नाचण्यात मजा

वाचण्या पेक्षा नाचण्यात मजा

आजच्या पिढीला वाचण्यापेक्षा नाचण्यात जास्त आनंद आहे . जयंती जोरदार साजरी होते पण महामानवाने दिलेला उपदेश फार कोणी पाळताना दिसत नाही. आज किती जणांनी आंबेडकर वाचले आहेत ? किती जणांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे ? 

आजपर्यंत जे जे संतमहात्मे होऊन गेले. त्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करतात. पण त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालणारे कमीच.
उलट राजकारणी, स्वार्थी लोक त्यांच्या मतलबासाठी याचा उपयोग करून घेतात आमचे गांधी, आमचे नेहरू, आमचा नथूराम, आमचे टिळक . अ‍ामचे शिवाजी महाराज, आमचे आंबेडकर, अ‍ामचे फुले, शाहूमहाराज. ही अशी वाटणी करून घेतली आहे. 

गेल्या वर्षी एका मोठ्या सिक्युरिटी कंपनीत मी मॅनेजर म्हणून काम करत होतो. तर आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी एका लेडी गार्डने मला विचारलं सर मला दोन दिवस सुट्टी पाहिजे. मी विचारलं कशासाठी ? तर ती म्हणाली सर, परवा आमचा सण आहे. मग मला रागच आला. मी तिला विचारलं तुमचा सण म्हणजे काय ? आंबेडकर तुमचेच आहेत का ? आमचे नाहीत का ? *आंबेडकरांनी संपूर्ण भारत देशासाठी कार्य केलेलं आहे. ज्याचा सर्वांनाच आदर असला पाहिजे*. हे ऐकल्यावर तिने मान खाली घातली आणि म्हणाली, सॉरी सर . यापुढे मी असं बोलणार नाही . आणि मग मी तिला एक दिवसाची सुट्टी सँक्शन केली.  

आध्यात्मिक क्षेत्रही याला चुकलेलं नाही कोणी म्हणे आम्ही स्वाध्यायी, कोणी म्हणतं आर्ट ऑफ लिव्हिंग. कोणी म्हणतं आम्ही निर्मलादेवीचे तर कोणी कलावती आईचे. कोणाचा मठ, कोणाचा आश्रम तर कोणाचा आखाडा. समजा एखादा स्वाध्यायी स्वामी समर्थ शिष्या बरोबर चर्चा करत असेल तर ते दोघंही एकमेकाला आमचा मार्गच कसा खरा परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणारा आहे . हे पटवून देण्याचा मागे असतात. खरं तर एकमेकांच्य‍ा चांगल्या विचारांच‍ा आदर करण्याचीच अ‍ापली मानसिकता असायला हवी. 
  
देवही माणसाने वाटून घेतले आहेत आणि प्रत्येक देवाला त्याचा वार ठरवून दिलेला आहे त्याच दिवशी त्या देवाचं नाव घेतलं की खूप मोठं पुण्य लाभते म्हणे . सोमवारी महादेव लवकर पावतो. गुरूवार दत्ताचा, शनिवार शनिदेवाचं महत्व. मंगळवार,
 शुक्रवार देव्यांचे वार. या दिवशी देव्य‍ांची पूजा केली तर त्या लवकर प्रसन्न होतात का ? 

परमेश्वर म्हणजे काय ? तर तो सद्गुणांचा समुच्चय आहे तुम्ही त्याला मूर्ती बनवून पूजा करा किंवा मनातल्या मनात ठेवा. परमेश्वराची आराधना, पूजा म्हणजे त्याच्यातल्या सद्गुणांची पूजा, आराधना . त्याच्यातले सगळे सद्गुण माझ्यामध्ये येऊ दे आणि माझ्यातले दुर्गुण निघून जाऊ दे ही प्रार्थना करायची हेच खरं अध्यात्म .
अजय बिरारी

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...