Marathi Kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi Kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १५ एप्रिल, २०२३

हात शेवईची कलामैदा भिजवा पाण्यातसोडा पापडाचा खारमीठ शेंधा कुटण्यात

हात शेवईची कला
दिनांक १४/४/२३

हात शेवईची कला
मैदा भिजवा पाण्यात
सोडा पापडाचा खार
मीठ शेंधा कुटण्यात

एक एक वडी करा
ठेवा ओल्या कापडात
लांब वळी ओढोनिया
शोभे ऐट तबकात

हात चाले भरभर
पीठ धावे भरभर
ओढ येई हातावर
फिरवावी गरगर

सखी स्नेहाची धावते
मध्यावर घाली हात
दोन हात गरगर
जाते बाई टोकरात

हवा असावी घरात
जणू केश कांती भासे
झाली चिप्प हातावर
उडवती सारे हासे

केस लांबसडक ते
भासे शेवयी रुपात
गोरी गोरी लांब लांब
मग शोभे कापडात

दूध शेवयी खायला
सारे कसे जमतात
वेलदोडे केशरात
तुपावर भाजतात

खीर किंवा उकडीचे
दूधातून मजा देई 
वाटीभर खिरीमध्ये
सुके मेवे आई नेई

मस्त अंगत पंगत
भोजनात येई मजा
खीर स्वाद घेण्यासाठी
काढा की थोडीशी रजा

खीर उपमा करावा
नच चरबी वाढावी
आरोग्याच्या पदार्थांना
रुची सदैव जोडावी

डबा लांबट आकार
वर्षभर साठवावा
आले गेले पाहुण्यांच्या
स्वागताला पाठवावा

शेवईची कला न्यारी
भिजवते सुगरण
नयनांच्या भुरळीत
ममत्वाची पखरण

सौ शोभा प्रकाश कोठावदे नवी मुंबई

डाॅ.बाबासाहेब जयंतीप्रकाशाचं दान

डाॅ.बाबासाहेब जयंती

प्रकाशाचं दान
 
बाबासाहेब, माणसांना दिलं जगण्याचं भान
काळोखातल्या आयुष्याला दिलं प्रकाशाचं दान // धृ//

जगणे जेथे मुश्किल होते, दारिद्र्याचा सुकाळ
भीमाबाई आई आणि पिता रामजी सकपाळ
कुटुंबातल्या या गरिबीची होती तुम्हास जाण
काळोखातल्या आयुष्याला...../१/

चिंतनात मनी मार्ग मिळाला, शिक्षण घेण्याचा
जिद्द ठेवुनी सारे मिळुनी, सुशिक्षित होण्याचा
हक्कासाठी लढूया सारे, शिक्षण हे वरदान
काळोखातल्या आयुष्याला....../२/

विचारधारा ज्योतिबांची,  शिरोधार्य मानुनी
वेचले संपूर्ण आयुष्य, संघर्षातच झुंजुनी
लाभली साथ पत्नी रमाची, खंबीर धीरवान
काळोखातल्या आयुष्याला....../३/

शिष्यवृत्ती सन्मान मिळता, परदेशी प्रयाण
घेऊन संधी परदेशात, अव्वलतेचा मान
तरबेज ग्रंथालयी वाचन, चिंतनातले ध्यान
काळोखातल्या आयुष्याला....../४/

मिळविल्यात पदव्या विविधांगी, बहू विषयक
न्यायशास्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ प्रबंधक
राजनीतिज्ञ, हृदयस्थ, समाजसेवक जाण
काळोखातल्या आयुष्याला....../५/

जपले शाहू फुले विचार,  भारतरत्न तुम्ही
दिले भारतीय संविधान, कायमचे ऋणी आम्ही
जरी धर्म भाषा अनेक, दिले ऐक्यनियम ज्ञान
काळोखातल्या आयुष्याला......./६/

दिला संदेश  धर्म , माणुसकी संविधानात
दुमदुमले नाव देशाचे, लोकशाही जगतात
जोवरी सूर्य चंद्र नभी, गाणार तुमचे जयगान
काळोखातल्या आयुष्याला दिलं प्रकाशाचं दान/७/

सुशीला हेमचंद्र पिंपरीकर, नाशिक

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

माझी आई अशीच आहे      🌹🌹🌹🌹🌹🌹*******************... नानाभाऊ माळी "श्रीमंतांची मम्मी असतें  गरीबाची माय असतेंआई दोघांची सेम असतेंआई ती आईचं असतें!..🌷

माझी आई अशीच आहे
      
🌹🌹🌹🌹🌹🌹
*******************
... नानाभाऊ माळी 

"श्रीमंतांची मम्मी असतें
  गरीबाची माय असतें
आई दोघांची सेम असतें
आई ती आईचं असतें!..🌷

आई रावणाची असतें 
आई रामाचीही असतें
हृदयाची माया असते
संस्कार शाळा असतें!..🌹

काट्यातील फुल असतें
आई देवासारखी दिसते
बाळाशी गोड हसते
..आई सर्वांचीचं असतें!🌷

आई स्वतःचीचं नसते
ममतेचा बाजार असतें 
गोड बोलण्यात फसतें 
कणकणात आई असतें!🌹

..माझ्या दोन्ही बहीणी पुण्यातल्या कात्रजमध्ये राहायला आहेतं!माझ्या मोठया बहिणीचा मुलगा,माझा भाचा काल अचानक रिक्षा घेऊन आमच्या घरी आला होता!तसा तो पुण्यात रिक्षा चालवतो!त्याच्या सोबत उगवत्या सूर्य साक्षीने गप्पा टप्पा सुरु होत्या अन मला सहज बोलून गेला,'दोन-चार दिवस आजींना कात्रजला घेऊन जातो मामा!आजींना वातावरणात थोडा बदलही होईल!आजींना बरं वाटेल!माझ्या आईलाही बरं वाटेल!..माझं बालपण आजींच्या ममतेच्या सावलीत गेलेलं आहे!माझ्या खोड्यांची जंत्री खूप मोठी होती!आजीमुळे मी कित्येकदा अनेकांचा मार खाण्यापासून वाचलो आहे!मला आजीने घडवलं जगण्याची तालीम दिली!आज मी आजीमुळेचं उभा आहे मामा!आई तर दिवसभर बाजारात भाजी विक्रीला गेलेली असायची!'.. थोडा थांबला अन पुन्हा बोलू लागला ,'मामा आजींना घेऊनचं जातो ना काही दिवस!आजींच्या मांडीवर बरेच दिवस डोक ठेवायला मिळालंच नाही हो मला!आज माझी मुलगी १०वीला आहे!तरी मी लहानच आहे!आजी आहेच अशी!'

काळ मागे सरकत असतो!आपण पुढे सरकत असतो!आई दिवाणवर बसली होती!अलीकडे आईला वयोमानानुसार कमी ऐकू यायला लागलं आहे!भाचा माझ्याशी बोलतं होता!आईच्या कानावर एखादा दुसरा शब्द पडतं होता!नातू आल्याचा आनंद आजींच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता!एक वेगळ तेज, झळाळी आईच्या चेहऱ्यावरून दिसतं होती!नातू आल्याचा आंनद काही वेगळाचं होता!!.. सकाळ होती!आईने सुनेला अर्थात आमच्या अर्धांगिनीला प्रथम कळण्याची भाकरी (दोन-तीन डाळी एकत्र करून थोडं मीठ टाकून दळून आणलेलं पीठ)करायला सांगितले!तव्यावर चटका घेतं भाकरी चांगली भाजली गेली!भाकरीची पूड,पोट उघडून,पोपडा काढून आतल्या पोटात तेल तिखट टाकून भाकरी ताटात ठेवून भाऊसाहेबा समोर ठेवली!🌹

भाऊसाहेबाला कळण्याची भाकरी अजिबात आवडत नव्हती!आजीच्या हट्ट रेट्यापुढे त्याने हात टेकला अन कशीतरी गळ्याखाली भाकरी ढकलली!भाकरी खातांना भाऊसाहेब बोलला,'आजी तयारी कर,आपल्याला कात्रजला जायचं आहे!'थकलेली!हातापायांची नाजूक वळकुटी झालेली माझी आई काही वेळ माझ्याकडे पाहत होती!काही वेळ सुनेकडे पाहत होती!काही वेळ नातसूनेकडे पाहत होतीअन रागावून बोलू लागली,'तुम्हाला माझा कंटाळा आला आहे का? माझी ही गलितगात्रे येथेच तुमच्या येथे ठेवून कायमची जाणार आहे!'..आईच्या यां शब्दांनी माझ हळव मन द्रवलं होतं!मनाला खूप वाईट वाटले होते!आई अशी का बोलली? आई ती आईचं असतें!आई देवाकडून मिळालेली जन्माची हृदयातली भेट असतें!टचकनं डोळयांतून पाणी आलं!मी स्वतःला सावरत बोललो,'आई नसेल जायचं तर नको जावू!' पुन्हा भाच्याकडे पाहत बोललो,'भाऊसाहेब जा तू!आजींना यां वयात प्रवासाची दगदग सहन होत नाही!''🌹

भाऊसाहेब हट्टाला पेटला होता,'आजी आमच्याकडे येऊन खूप दिवस झालेत तूला!चल ना आजी!तूला कुठला ही त्रास होणार नाही इतकं फुलासारख जपू!फक्त सात आठ दिवसचं यें'.. आई शेवटी जायला तयार झाली!आईची पिशवी तरी किती मोठी असावी बरं?फक्त दोन साड्या!झालं!!!आई कधीच कोणासाठी ओझं झाली नाही!ती कोणासाठी ओझं होणारच कशी!जन्मोजन्मीचें आभाळभर उपकार आईचे असतात!आईची पिशवी कशी कशी हलकी फुलकी होती!ममतेचे बोल सतत साथ संगत करणारे!... आई नेहमी म्हणत असतें,'आपण सोबत काय घेऊन आलो आहोतं ? मागे ओझं का ठेऊन जावे!सर्व येथेच यां मातीत ठेवून एकट्याने निघून जायचं आहे!हलकं हलकं होऊन निघून जायचं आहे!कोणाला त्रास नं देता निघून जायचं आहे!'.. आईच्या मुखातून अशा निरवानिरवीचें शब्द कानी पडल्यावर मन भरून येत होतं!
अलीकडे आई खुपचं हळवी झाली आहे!१०० वर्षे पार केलीतं तरी उत्तम आरोग्य लाभलेल्या आईसोबत रहाणे आम्हास भाग्य लाभले आहे!🌹

आईचें हात धरून हळूहळू घराच्या पायऱ्या उतरलो!आईने माझा हात घट्ट धरला होता!माझा मानसिक आधार असणारी आई!माझा हात धरून खाली उतरत होती!भाच्याच्या रिक्षात बसवलं!आईच्या मायेचे हात माझ्या डोक्यावरून फिरत होते!रिक्षातच आईच्या पायांवर डोकं ठेवलं!अन आशीर्वाद घेतं असतांना मनोमन देवाला प्रार्थना केली,'माझ्या आईचं आयुष्य स्वतःच्या पायांवर चालते आहे,स्वतःची सर्व कामं स्वतःच्या हातांनी करते आहे तोवर तिला दीर्घायुष्य दे देवा!अजून दहा वर्षांचं तरी आयुष्य वाढवून दे हिचं प्रार्थना करतो !' भाच्याने रिक्षाचा एक्सलेटर पिळला तशी कात्रजच्या दिशेने निघूनं गेली!आई वळून वळून हात देत होती!मी हात हलवत होतो!रिक्षा दिशेनांशी होईपर्यंत मी रिक्षाकडे पाहत होतो!माझे हलणारे हात खाली आलेत!मन भरूनं आलं होतं!आई बहिणीकडे गेली!मी डबडबलेल्या डोळ्यांनी घरी आलो!घरात आईच बसायचं ठिकाण रिकामं होतं!तिकडेच टक लावून पाहत होतो!सौभाग्यवतीनें आवाज दिल्यावर मी भानावर आलो होतो!
माझी आई अशीच आहे!सर्वांचं हृदय घेऊन गेली होती!🌷

आई मानसिक आधार असतें!तिचं हळवेपण आपल्यात आलेलं असतं!आई हृदयाचा ठोका असतें!आई शिवलेला टाका असतें!आई गजबजलेलं गावं असतें!पूर्ण काठोकाठ भरलेलं मन रिते करण्याचं हक्काचं ठिकाण असतें!घरात आल्याबरोबर हसरंमुख असणारीं, जीव भांड्यातं पडल्या इतकं हळवं मन असणारी व्यक्ती आईचं असतें!आई आपल्या जगण्याचा धागा असतें!अन्य फाटकें,तुटकें हृदय आपल्या मायेच्यां धाग्यानीं शिवत असतें!दूर गेलेली कित्येक हृदय आपल्या विशाल ठिगळांनी शिवत नाते जोडत असतें!आई विठाई सारखी असतें!भक्तांसारखे सर्व नाते आपल्या भक्कम खांद्यावर घेऊन श्रद्धा मंदिर होऊन जात असतें!माझी आई अशीच आहे!🌹

वडील खोबरे अन खोबऱ्याची टणक कवटी असतात!आई खोबऱ्यातील गोड पाणी असते!आई आपल्या आजारी मुलांसाठी रात्र रात्र जागत असतें!आई रत्नपारखी असतें, परक्यालाही पारखून आपलेसे करीत असतें!आई सेवाव्रत्ती असतें!आई प्रेम स्नेहाचां मेघ असतें,धो..धो बरसून मोकळे होणारी असतें!निरभ्र होणारी असतें!आईला अष्टपैलूपद देवानेचं दिलेलं आहे!सर्व भूमिका हसत पार पाडणारी,सहन करणारी स्वतःचं दुखी-कष्टी मन कोणाला कधीही न सांगणारी आई महान असतें!आई कधी चहाच्या कपातील वाफ होते!जिभेला चव देत स्वतः हवेत एकजीव होऊन जाते!प्रेमाचे नाते पेहरणारी आई घराघरात असतें!मी आईच्या बसण्याच्या जागेकडे जागेकडे एक टक पाहत होतो!आई कात्रजला गेली,घराचा चंदन सुगंध घेऊन गेली होती!माझी आई अशीच आहे!🌹

बालपणापासून सत्य,शिव अन सुंदरतेची ओळख करून देणारी आई स्वतः ईश्वरी रूप असूनही ती विसरून गेलेली असतें!आईच्या दृष्टीत अन हृदयात सत्य निवासाला असतं!सत्य अस्सल पिवळे सोनं असतं!आई मुलांना याचं सत्याची ओळख करून देत असतें!मुलांवर संस्कार करीत असतें!वडील घराबाहेरील संस्कार देत असतात तर आई आयुष्यभर हृदयातलं अमृतरस वाटीत राहते!जन्मताच बाळाची नाळ कापल्यावर बाळाच्या मुखातून 'आई' नावाचा पहिला उच्चार बाहेर पडतो!म्हणूनचं आई देवस्वरूप दूत असतें!अखंड आयुष्यभर हृदयातून जिभेवर शब्द येत असतात 'आई'!.. माझी आई अशीच आहे!🌹

अंतःकरणापासून आईवर अपार निष्ठा,असणाऱ्या अनेक सुपुत्रांनी जीवनात अलौकिक गौरव प्राप्त केला आहे!स्वतःचं जीवन घडवीत असतांना इतरांचे जीवनही घडवीत जगदंविख्यात झालेत!आई अशीच असतें!पाण्याच्या निर्मळ,स्वच्छ प्रवाह प्रमाणे,वहात वहात सर्वांना संस्कारक्षम करून सोडते!स्वतः चिखल होऊन जगत असतें!आई श्रद्धेचं,पावित्र्याचं,सहानुभूती,
सहनशक्तीचं विद्यापीठ बनून जाते!परोपकाराची बीजे पेहरणारी आई आपलं आयुष्य प्रदान करीत असतें!माझी आई अशीच आहे!🌹

दळलेल्या गरम पीठात हात टाकून पाण्यात भिजवून मळून उत्तम भाकरी थापून तव्यावर भाजणारी आई आयुष्यभर चटका घेतं जगत असतें!आनंद, सुख, ममता, कोमलता, वाटीत असतें!स्वतः जळत उजेड देत असतें!आईची गोड अवीट वाणी कानांना मंत्रमुग्ध करीत असतें!आई आयुष्याचं पुण्य असतें,मुलांना सहज मिळतं म्हणून आईचं महत्व मुलं उशिराने जाणतात!माझी आई कात्रजला गेली!तिच्या जाण्याने घरातलं सुगंध निघून गेला होता!सर्वांच्या घरात आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!🌹

अंतःकरणापासून आईवर अपार निष्ठा,असणाऱ्या अनेक सुपुत्रांनी जीवनात अलौकिक गौरव प्राप्त केला आहे!स्वतःचं जीवन घडवीत असतांना इतरांचे जीवनही घडवीत जगदंविख्यात झाले आहेत!आई अशीच असतें!पाण्याच्या निर्मळ, स्वच्छ प्रवाह प्रमाणे,वहात वहात सर्वांना संस्कारक्षम करून सोडते!आई श्रद्धेचं,पावित्र्याचं,सहानुभूती, हळवेपणाचं,सहनशक्तीचं,मातृपणाची संस्कार विद्यापीठ बनून जाते!परोपकाराची बीजे पेहरणारी आई पवित्र श्रद्धेचा गाभारा असतें!.. माझ्या मंदिराचा शांत, शितल,
कनवाळू गाभारा कात्रजला गेला होता!गाभाऱ्यातील मूर्ती मंदिर सोडून कात्रजला गेली होती!घरोघरी आई रुपी सुंदर मूर्ती असतात!माझी आई अशीच आहे!पवित्र गाभाऱ्यातील सुंदर मूर्ती आहे!🌹

महाली चपाती लाटते
झोपडीत भाकर रांधतें
आई वासरूस चाटते
मायेने घरं ती थाटते..🌷

कधी आभाळ फाटते
 ....कधी जंगल पेटते 
........तेथे आई भेटते
   मज आभाळ वाटते!🌷

अशी माझी आई आहे!ती कात्रजला गेली आहे!!!
*************************
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
*************************
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१३एप्रिल २०२३

मी ज्योतीराव फुले बोलतो आहे नानाभाऊ माळी

मी ज्योतीराव फुले बोलतो आहे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
...नानाभाऊ माळी 

मी कोण होतो? काय होतो? मी कुणासाठी झिजलो?आयुष्यभर लढलो!समर्पित भावनेने लढलो!नेटाने लढलो!गावाबाहेर,
वेशीबाहेर कुत्र्यासारखे जीवन जगणाऱ्या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी लढलो!दीन-दु:खी अतिशूद्र भावंडांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढलो!..लढतं झुंजलो!झिजलो कधी माघार घेतली नाही!
माझा मार्ग सत्याचा होता!माझा मार्ग न्यायाचा होता!माझा मार्ग अज्ञानी बांधवांना ज्ञानी करण्याचा होता!स्त्री मनात ज्ञानप्रकाश दाखविण्याचं भाग्य मिळालं!अतिशद्रांच्या दारात उभे राहून ज्ञानसूर्य दाखविण्याचं महाभाग्य लाभलं!जातीभेदाच्या पायावर उभा असलेला वर्ग शिक्षणापासून वंचित होता!त्यांनां ज्ञानी करण्याचं भाग्य निर्मिकाणे मला दिलें होते!अथकपणे कष्ट, झुंज, हक्काची लढाई लढत राहिलो!

...मी ज्योतीराव गोविंदराव फुले बोलतो आहे!मी महात्मा फुले बोलतो आहे!मी पुण्यातल्या गंज पेठेतील ज्योतीराव फुले बोलतो आहे!मी कर्मठांच्या पुणे शहरातील फुले बोलतो आहे!सर्व काही सहन करूनही जिद्दीने,ताट मानेनें उभा असलेला मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!...वर्षे कशी भरा भरा मागे निघून गेलीत!!इतिहासाची अनेक महत्वपूर्ण पाने उलटूनी गेलेतं!काही पाने जीर्ण झालीत!शिर्ण झालीत!१७५वर्षं झाली आहेत!इतिहास त्याचं जीर्ण पानातून जीवंत आहे!अजून शोषण जीवंत आहे!शोषणाची पद्धत त्या ठेकेदारांनी बदलली आहे!लढा सुरूच आहे!जातीयवाद अजूनही जीवंत आहे!स्वार्थ अजूनही धर्माच्या आड जीवंत आहे!तुमच्या शक्तीतून माझा लढा सुरूचं आहे!मी महात्मा फुले बोलतो आहे!

जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून जगावा!जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती न्याय हक्काने जगावा!शोषण विरहित जगावा!जगा अन जगू द्या सारखं जगावं!जातीच्या भक्कम भिंती फोडून,तोडून माणूस म्हणून जगावा!उच-निचता समाजाला लागलेली किड आहे,ती गाडून जगावा!वर्णभेदानें फोफावलेंली किड आहे, ती गाडून जगावा!प्राचीन काळापासून समस्त समाजास पोखरत राहिलेंली वाळवी आहे, ती नष्ट करून जगावा!किडेचा नायनाट व्हावा म्हणून माझा लढा होता!लढा आहे!..मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

आज ११एप्रिल!माझा जन्मदिवस आहे!आपण माझा जन्मदिवस साजरा करीत आहात!जन्मापासूनचं शेती आणि फुलांची आवड होती!वडिलांचा व्यवसाय होता!वडिलांनी मला शाळेत पाठवलं होतं!मी शाळेत गेलो!काही वर्ग शिकलो!"शूद्रानां शिकण्याचा अधिकार नाही!पाप लागतं"..असं माझ्या वडिलांनां धर्माच्या ठेकेदारांनी सांगितले!शिक्षणाचा उजेड खालच्या स्तरापर्यंत पर्यंत पोहचू दिला नाही!शिक्षणाची दरवाजे बंदिस्त होती!यामुळे मी ही उच्च शिक्षणापासून वंचित राहिलो!उच-नीच,जातीयवादी,भेदाभेदनें मन व्याकुळ झालं होतं!संपूर्ण मानव समाजास यां धर्म ठेकेदारांनी वेठीस ठेवले होते!शिक्षणापासून वंचित ठेवले होते!माझ्यातील शिक्षणाची धग शमली नव्हती!राखेंखालीलं विस्तवागतं धग होती!..सर्वप्रथम माझ्या पत्नीला,सावित्रीबाईंना शिकविले!ज्ञानदानाचा प्रकाश घरात प्रकाशित झाला!त्याचा उजेड समस्त महिलांना पोहचविण्याचे कार्य मी आणि सावित्रीबाईंच्या अथक परिश्रमाने केलें!नवनवीन शाळा उघडून ज्ञानप्रकाश स्त्री मनात पोहचवीला!समस्यां अनेक होत्या!जाणूनबुजून खोडा घातला जात होता!अडथळे येत होती!तोंड देत,मार्ग काढीत ध्येयांकडे वाटचाल सुरूच होती!माझ्या भावा बहिणींनो मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

आपण माझी जयंती साजरी करीत आहात!जन्मोत्सव साजरा करीत आहात!गावोगावी मिरवणूक काढून माझ्या कार्यास उजाळा देत आहात!सत्यशोधकी विचार,सत्यधर्माच प्रसार आपण केलात!आम्ही त्या काळी खऱ्या धर्माची,माणसातील माणुसकीची ओळख करून दिली! ती ज्योत माझ्या सर्व बांधवांनी तेवत ठेवली होती!स्त्री शिक्षणाच्या पेटवलेल्या ज्योतीतून अथकपणे शुद्रादि शुद्रांसाठीचा ज्ञानप्रकाश पोहचत होता"अंधश्रद्धे विरुद्ध लढत होतो!समाजावर धर्ममार्तंडांचां प्रचंड पगडा होता!अस्पृश्य वेशी बाहेर होते!हीन जीवन जगत होते!माणूस मुक्तीचा लढा सुरूचं होता!आज त्या कार्यास १७५ वर्षे झाली आहेत!लढा सुरूच आहे!आज आपण लोकशाहीतं जगत आहात!नवे वारे वहात आहेत!नव्या वाऱ्यातही जातीभेदाच प्रदूषण हळूहळू विष बनून फैलावत आहे!... मला अतीव दुःख होत आहे!जातीभेदाच्या भिंती अजूनही तशाच उभ्या आहेत!जातीच्या नावावर राजकारण होतं आहे!धर्माच्या नावाने राजकारण होत आहे!आधुनिक जगात वावरत असूनही जातीभेदाच्या भिंती ढसाळल्या नाहीत अजून!... मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!

धर्माच्या आडून स्वार्थ साधला जात आहे!शिक्षणाने उच्च शिक्षित होऊन ही जात आडवी येत आहे!अजूनही जातीच्या भक्कम जोखंडातून समाज मोकळा झालेला नाही!माझा त्यावेळेसही मानसिक छळ झाला होता!त्रास दिला गेला होता!मी धाडसाने सामोरा जात राहिलो!आज ही तेचं घडतं आहे!जातीभेदाची दरी वाढते आहे!जातीनिर्मूलन झालेचं नाही पण जातीयवादी शक्ती उघड उघड आव्हान देत आहेत!स्त्री-पुरुष समानता अजूनही आलेली नाही!फक्त कागदावर आलेली आहे!तोच कागद वादळात अधांतरी उडत आहे!जातीयवाद अन वर्गवादाचा अजगर ठेकेदारांकडून पोसला जात आहे!.....मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

माझं स्वप्न होतं!माझी मागणी होती!माणसाला माणूस बनवायचं होतं!जातीविरहित समाज नजरेसमोर होता!स्वातंत्र्य,बंधुता, समानता, समता,समरसतेवर आधारित समाज रचना असावी असं माझं स्वप्न होत!न्याय हक्कासाठी माझा लढा होता!माणूस कुणाचा गुलाम नाहीये!माणूस जन्माने शूद्र, अतिशूद्र असला म्हणजे श्रेष्ठ नाही का?शिक्षणाने तो सर्व श्रेष्ठ ठरतो!माझा लढा शेतकऱ्यांच्या दरिद्री, दैन्यवस्थेसाठी होता!माझा लढा सत्य शोधनाचा होता!माझा लढा शिक्षणासापासून वंचित असलेल्या स्रि्यांसाठी होता!माझा लढा परित्यक्तां महिलांच्या भवितव्यासाठी होता!शूद्रादिशूद्रांच्या उन्नतीसाठी होता!माझा लढा वर्णभेद,जातीभेद उच्च-कनिष्ठ भेदभाव अन अन्याया विरुद्ध होता!माझा लढा दीन-दुबळ्यांच्या उद्धारासाठी होता!माझा लढा धर्ममार्तंडांच्या अन्यायी कृती विरोधात होता!मी लढत होतो!भांडत होतो!अजूनही लढा संपलेला नाहीये!माझा शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशूद्रांच्या दास्यमुक्तीसाठीचा लढा चालूचं ठेवला होता!समानतेचा हक्क, शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची हाक दिली होती!... मी 
मी संघर्ष केला होता!सावित्रीबाईची साथ होती!सर्वजन साथीला होते!सर्व पद दलितांची साथ होती!आजही माझं स्वप्न अधुरे आहे!अपूर्ण आहे!मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌷

पदोपदी माझा अपमान होत राहिला! उच्चवर्निंयांच्या मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आलें!माझ्यावर मारेकरू धाडले होते!सावित्रीबाईवरं सतत शेण,चिखल फेक होत राहिली!अन्याय सहन करीत स्त्री शिक्षणकार्य नेटाने सुरूच होतं!अतिशूद्र, सोषितांच्या हक्कासाठी माझा लढा होता!माझ्या घरचा हौद खुला केला होता!त्यांची तहान भागली होती!!माझ्या हृदयातली तहान भागली होती!मी शूद्र होतो!तें अतिशूद्र होते!दोघेही शोषित होतो!दोन्ही एकाचं पातळीवर होतो!माझं काय चुकलं होतं?? मी समस्त शोषित वर्गासाठी लढा उभारला होता!मूठभर स्वार्थ, ज्ञानी समजणाऱ्यांनी माझा कोंडमारा केला होता!माझं जगणं समर्पित होतं!हा माझा गुन्हा होता? प्राचीन जुनाट,खुळंचट परंपरेच्या अभेद्य भिंतीनां सुरुंग लावला होता!एक एक करीत त्या भक्कम भिंती ढासळू लागल्या होत्या!भगदाड पडायला लागले होते!सत्यशोधक समाजाचा सत्य दाखवणारा हा उजेड होता!मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

अंधश्रद्धेतं लिप्त ढोंगी धर्म ठेकेदार देवतांची भीती दाखवून लुटमार करत होते!त्यांना सामोरे जात सत्याचा लढा सतत सुरूच होता!माझा लढा खुळचट कर्मकांडाविरुद्ध होता!धर्मविरुद्ध नव्हता!माझा लढा वर्ण आणि वर्गवादाविरुद्ध होता!आम्ही घाबरलो नाही,डागमगलो नाही!सामाजिक न्यायाचा लढा अखंड सुरूच होता!शिक्षणाने माणूस ज्ञानी होतो!ज्ञाननिर्मितीचं केंद्र आमच्याचं घरात होतं!शिक्षण घराघरात पोहचवंत होतो!स्त्री-पुरुष शिकत होते!शुद्रादि अतिशूद्र शिकत होते! ज्ञानकण वेचित ज्ञान प्रकाशात न्हावून निघतं होते!माझा लढा अज्ञानी,दीन-दुबळयांच्या उद्धारासाठी होता!मानसिक जोखंडा पासून मुक्तीसाठी होता!सत्याचा लढा अखंड चालूच ठेवला होता!नंतर ही न्याय हक्कासाठी लढा सुरूचं आहे! शोषित सामाजिक समानतेपर्यंत पोहचत नाहीत तोवर हा लढा सुरूचं राहणार आहे!..मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

माझा लढा मानव उद्धारासाठी होता!धार्मिक अवडंबर विरोधात होता!गावाच्या वेशीबाहेरील शोषितांसाठीचं होता!अस्पृशांसाठीच होता!स्त्री शिक्षणासाठीचं होता!पोटासाठी लाचार असणाऱ्या शुद्रादी अतिशद्रांसाठी,पोटग्रस्तांसाठी होता!कुत्र्यापेक्षाही हिन जगणं ज्यांच्या वाट्याला आलं त्यांच्या हक्कांसाठी होता!हा वर्ग संघर्ष होता!हा वर्ण संघर्ष होता!धर्माच्यां निश्चित अर्थासाठी होता!माणूस पशु नाही!माणूस गुलामही नाही!माणसाला बुद्धी आहे!वाचा आहे!तो गुलाम कसा होऊ शकतो?माणूस जन्माने श्रेष्ठ नाही!माणूस कर्माने श्रेष्ठ आहे!माझा लढा अन्यायी रूढी विरोधात होता!तो विरोध तुमच्या रूपातून अजूनही जीवंत आहे!समान न्यायासाठीचा हा लढा अजूनही जीवंत आहे!आपण जातीभेदाच्या भिंतीनां धडका देत रहा!माणसाच्या मानसिक वेठीबिगारी अन गुलामी पासून मुक्ती मिळेल तेव्हांचं खरं स्वातंत्र्य नजरेस दिसेल!माझा लढा हा तुमच्यातून उभा आहे!मी तुमच्यात उभा आहे!तुम्ही लढत रहा!.. मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

सत्याचा आग्रह धरून चालतांना "सत्यशोधक समाजाची" स्थापना केली!शोषित वर्गाला न्याय मिळावा म्हणून २४सप्टेंबर १८७३साली पुणे नगरपालिकेचा सदस्य झालो होतो!सार्वजनिक सत्यधर्म पुजाविधी पुस्तक असं अशा अनेक आधुनिक मूल्यांचां प्रारंभ केला होता!आधुनिक क्रांतिची मशाल घेऊन पुढे निघालो आहोत!माझा लढा मानवतावादी दृष्टिकोनासाठी होता! माझा कार्यगौरव म्हणून "महात्मा" पदवीनें सार्वजनिक ठिकाणी गौरविण्यात आल होत!रात्रंदिवस फक्त आणि फक्त शोषितांच्या जगण्यासाठीचा लढा उभारला होता!बालहत्या प्रतिबंधक गृह सुरुवात केली होती!अनेक रात्रशाळा सुरु केल्या होत्या!"ब्राम्हनांचे कसब" पुस्तकातून माझा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला होता!माझा लढा आर्थिक उन्नतीसाठी होता!माझा लढा सामाजिक न्यायासाठी होता!स्रिशिक्षणासाठी हंटर कमिशन समोर निवेदन देण्याचा आग्रह होता!"तृतीयरत्न" हे नाटक, "इशारा","अस्पृशांची कैफियत" ग्रंथातून मांडली होती!माझा लढा थांबलेला नाहीये!पुढे असाच समाजाच्या उन्नतीसाठी चालू राहील!तुमच्या कृतीतून चालू राहील!माझा लढा थांबलेला नाहीये अजून!सामाजिक क्रांतीची मशाल घेऊन लढा सुरूचं राहणार आहे!"🌹

जन्माने उच्च अन श्रेष्ठ समजणारे मूठभर ठेकेदार विशाल सागरासं ओंजळीत घेऊ शकत नाहीत!खुळचट धर्म कल्पनांनी जन्माने श्रेष्ठत्व लादू शकत नाहीत!आपण परिपूर्ण ज्ञान समृद्धीने समानतेचा पाया रचत आहात!त्यातूनचं शास्वत सत्यधर्माचा जन्म होतं राहील!उचनीच भेदभाव विरहित माणसाचा जन्म होतं राहील!सत्यासाठी माझा लढा होता!माझा लढा जोखंडापासून मुक्तीचा होता!संपूर्ण परिवर्तनाचा होता!माझा लढा कष्टाळू शेतकऱ्यांसाठी होता!माझी लेखणी न्यायासाठी आक्रमक झाली होती!मी लिहीत होतो!मी तसाचं कृती करीत होतो!मी ताठपणे उभा होतो!माझ्या विरुद्ध अनेक होते!मी विरोधाला जुमानित नव्हतो!माझा लढा स्त्री दास्य मुक्तीसाठी होता!अजूनही त्याच सत्याची वाट पाहत मी उभा आहे!अनेक पुतळ्यातून आपणास उमेदीचा संदेश देत उभा आहे!माझा पुतळा अंधारातून उजेड दाखवत उभा आहे!सामाजिक क्रांतीची मशाल होऊन अनेक ठिकाणी, अनेक शहरात,खेड्यात उभा आहे!तेथे पूर्ण सत्याचा उजेड असेल!वाट पाहत आहे!मी महात्मा ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

सत्य दर्शनासाठी "शेतकऱ्याचा आसूड" लिहावा लागला!अमेरिकेतील शोषित निग्रो बांधवांच्या छळानें "गुलामगिरी"लिहावं लागलं! हा ग्रंथ निग्रो बांधवाना अर्पित केला होता!महाराष्ट्र शूर,धाडसी,लढाऊंचा देश आहे!छत्रपती शिवाजी राजांवर माझी नितांत श्रद्धा होती!रायगडा वरील समाधी शोधली अन पोवाडा लिहून शौर्याची गाथा माझ्या हृदयातून गात राहिलो!... मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-११एप्रिल २०२३

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...