आजच्या पिढीला वाचण्यापेक्षा नाचण्यात जास्त आनंद आहे . जयंती जोरदार साजरी होते पण महामानवाने दिलेला उपदेश फार कोणी पाळताना दिसत नाही. आज किती जणांनी आंबेडकर वाचले आहेत ? किती जणांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे ?
आजपर्यंत जे जे संतमहात्मे होऊन गेले. त्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करतात. पण त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालणारे कमीच.
उलट राजकारणी, स्वार्थी लोक त्यांच्या मतलबासाठी याचा उपयोग करून घेतात आमचे गांधी, आमचे नेहरू, आमचा नथूराम, आमचे टिळक . अामचे शिवाजी महाराज, आमचे आंबेडकर, अामचे फुले, शाहूमहाराज. ही अशी वाटणी करून घेतली आहे.
गेल्या वर्षी एका मोठ्या सिक्युरिटी कंपनीत मी मॅनेजर म्हणून काम करत होतो. तर आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी एका लेडी गार्डने मला विचारलं सर मला दोन दिवस सुट्टी पाहिजे. मी विचारलं कशासाठी ? तर ती म्हणाली सर, परवा आमचा सण आहे. मग मला रागच आला. मी तिला विचारलं तुमचा सण म्हणजे काय ? आंबेडकर तुमचेच आहेत का ? आमचे नाहीत का ? *आंबेडकरांनी संपूर्ण भारत देशासाठी कार्य केलेलं आहे. ज्याचा सर्वांनाच आदर असला पाहिजे*. हे ऐकल्यावर तिने मान खाली घातली आणि म्हणाली, सॉरी सर . यापुढे मी असं बोलणार नाही . आणि मग मी तिला एक दिवसाची सुट्टी सँक्शन केली.
आध्यात्मिक क्षेत्रही याला चुकलेलं नाही कोणी म्हणे आम्ही स्वाध्यायी, कोणी म्हणतं आर्ट ऑफ लिव्हिंग. कोणी म्हणतं आम्ही निर्मलादेवीचे तर कोणी कलावती आईचे. कोणाचा मठ, कोणाचा आश्रम तर कोणाचा आखाडा. समजा एखादा स्वाध्यायी स्वामी समर्थ शिष्या बरोबर चर्चा करत असेल तर ते दोघंही एकमेकाला आमचा मार्गच कसा खरा परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणारा आहे . हे पटवून देण्याचा मागे असतात. खरं तर एकमेकांच्या चांगल्या विचारांचा आदर करण्याचीच अापली मानसिकता असायला हवी.
देवही माणसाने वाटून घेतले आहेत आणि प्रत्येक देवाला त्याचा वार ठरवून दिलेला आहे त्याच दिवशी त्या देवाचं नाव घेतलं की खूप मोठं पुण्य लाभते म्हणे . सोमवारी महादेव लवकर पावतो. गुरूवार दत्ताचा, शनिवार शनिदेवाचं महत्व. मंगळवार,
शुक्रवार देव्यांचे वार. या दिवशी देव्यांची पूजा केली तर त्या लवकर प्रसन्न होतात का ?
परमेश्वर म्हणजे काय ? तर तो सद्गुणांचा समुच्चय आहे तुम्ही त्याला मूर्ती बनवून पूजा करा किंवा मनातल्या मनात ठेवा. परमेश्वराची आराधना, पूजा म्हणजे त्याच्यातल्या सद्गुणांची पूजा, आराधना . त्याच्यातले सगळे सद्गुण माझ्यामध्ये येऊ दे आणि माझ्यातले दुर्गुण निघून जाऊ दे ही प्रार्थना करायची हेच खरं अध्यात्म .
अजय बिरारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा