"आला आला उन्हाळा, आता तब्येत सांभाळा " उन्हाळा म्हटले की नुसते कडक ऊन, वातावरण अगदी रुक्ष,जमीन कोरडी,पाण्यासाठी आसुसलेली, कुठेही मन लागत नाही. सगळीकडे अगदी कडक, चमकणारा सूर्यप्रकाश, डोळ्यांनाही नकोसे व शरीरासह मनासही नको वाटणारे असे ऊन..व तीच परिस्थिती शरीरातही (( जे पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने ))
यांमध्येच जर आपण अगदी 'थंडगार माठातील पाणी' असे जरी उच्चारले तरीही शरीर व मनास आल्हाददायक, तृप्त झाल्यासारखे वाटते...
उन्हाळ्यात शरीरास पाण्याची आवश्यकता अधिक भासते त्यासाठी वेगवेगळी थंड व आरोग्यदायी पेय जी आपल्याला उन्हाळ्यात उपयुक्त ठरतील.
1) थंड पाणी - (फ्रीजमधील थंड पाणी नको) माठातील थंड पाणी घ्यावे. माठातील पाण्यात जर वाळा (उशीर) या नावाची आयुर्वेदीक वनस्पती टाकली व ते पाणी नित्य नियमाने पिले तर पित्ताचे त्रास जसे की लघवीची जळजळ, हातापायांची जळजळ, डोळ्यांची जळजळ यांचा त्रास होणार नाही. उकळून थंड केलेले पाणी पचण्यासाठी हलके असते. उकळून थंड केलेले पाणी जास्त वेळ ठेऊ नये व दुसर्या दिवशी पिऊ पण नये त्यासाठी आजच्या एका दिवसापुरतेच पाणी उकळून घ्यावे. दुसर्या दिवशी नवीन दुसरे पाणी वापरावे.
2) ताजे गोड लिंबू सरबत-
उन्हाळ्यात लिंबू सरबत भरपूर प्रमाणात घ्यावे. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी व इलेक्ट्रोलाइट्स चा समतोल नीट राहण्यास मदत होते. शरीरातील उष्णता कमी करते. लिंबामध्ये Vitamin C भरपूर प्रमाणात असते.
3) नारळ पाणी -
नारळ पाणी गोड असून ते तहान कमी करण्यास मदत करते. पचण्यास हलके, थंड, आल्हाददायक व भरपूर प्रमाणात लघवी होण्यास मदत करते.
4) कैरीचे पन्हे -
कैरीचे पन्हे अवश्य घ्यावे याने दाह/जळजळ कमी होते. तोंडास चव येते व पचनासही मदत करते.
5) कोकम सरबत -
यास 'आमसूल' असेही म्हणतात. स्वयंपाकात चिंचेऐवजी याचा वापर करावा. याच्या फळांचे सरबत तहान कमी करते. ज्यांना पित्तामुळे अंगावर गांधी उठणे इ. त्रास असतात त्यांनी हे अवश्य घ्यावे.
6) धन्याचे पाणी -
10 ग्रॅ थोडेसे कुटलेले धने व 60 मिली पाणी रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी ते थोडे हाताने कुस्करून घेऊन पाणी गाळून प्यावे. त्यात थोडी खडीसाखर घालून घेतले तरी चालेल. (मधुमेही वर्ज्य) याने लघवीची आग कमी होते. शरीरातील उष्णता लघवीवाटे बाहेर पडते.
7) वाळ्याचे सरबत-
अति प्रमाणात व दुर्गंधी युक्त घामाचे प्रमाण कमी करते.
8) आवळा सरबत- सर्व पित्तामुळे होणार्या त्रासासाठी उपयुक्त, शरीरातील उष्णता कमी करते. आवळ्यात Vitamin C भरपूर प्रमाणात असते.
9) ताजा ऊसाचा रस-
ऊसाचा रस थंड, बलकारक आहे. परंतु ऊसाचा रस पिताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे ऊसाचा रस नेहमी ताजा व बर्फ रहित घ्यावा. शिळा ऊसाचा रस घेऊ नये.
9) ताजे गोड ताक -
ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृतच !! ताक पचण्यास हलके, भूक वाढवणारे,रुचीकर, चव देणारे आहे. आंबट ताक घेऊ नये.
साधारणपणे इत्यादी पेय शरीरास थंडावा देण्याकरिता वापरु शकतो. याचा उपयोग नक्की करावा.
इतर हवाबंद थंड पेय यांचा वापर शक्यतो टाळावा......
चला तर मग खूश राहा,आनंदी राहा, आणि निरोगी राहा....
धन्यवाद 🙏🙏
🖋📗डॉ.शितल यादव-पाटील व डॉ. बालाजी पाटील
श्री विश्वइंदु आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, आरोग्य नगर, उमरगा.