दिनांक १४/४/२३
हात शेवईची कला
मैदा भिजवा पाण्यात
सोडा पापडाचा खार
मीठ शेंधा कुटण्यात
एक एक वडी करा
ठेवा ओल्या कापडात
लांब वळी ओढोनिया
शोभे ऐट तबकात
हात चाले भरभर
पीठ धावे भरभर
ओढ येई हातावर
फिरवावी गरगर
सखी स्नेहाची धावते
मध्यावर घाली हात
दोन हात गरगर
जाते बाई टोकरात
हवा असावी घरात
जणू केश कांती भासे
झाली चिप्प हातावर
उडवती सारे हासे
केस लांबसडक ते
भासे शेवयी रुपात
गोरी गोरी लांब लांब
मग शोभे कापडात
दूध शेवयी खायला
सारे कसे जमतात
वेलदोडे केशरात
तुपावर भाजतात
खीर किंवा उकडीचे
दूधातून मजा देई
वाटीभर खिरीमध्ये
सुके मेवे आई नेई
मस्त अंगत पंगत
भोजनात येई मजा
खीर स्वाद घेण्यासाठी
काढा की थोडीशी रजा
खीर उपमा करावा
नच चरबी वाढावी
आरोग्याच्या पदार्थांना
रुची सदैव जोडावी
डबा लांबट आकार
वर्षभर साठवावा
आले गेले पाहुण्यांच्या
स्वागताला पाठवावा
शेवईची कला न्यारी
भिजवते सुगरण
नयनांच्या भुरळीत
ममत्वाची पखरण
सौ शोभा प्रकाश कोठावदे नवी मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा