शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

कामगार चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे व लेख



डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार चळवळ

       आजच्या वर्तमानस्थितीचं अवलोकन केले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगारांच्या बाबतीतील विचारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण सध्याच्या परिस्थितीत कामगार ज्या अवस्थेतून जात आहेत त्यामागची कारणं जर लक्षात घेतली तर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व लक्षात येते. कोरोनाच्या महामारीमुळे भारतात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्वच व्यवहार ठप्प पडले.कारखाने बंद झाले. सर्वच प्रकारचे उद्योग व्यवसाय हे बंद झाले. त्यामुळे त्यावर आधारित सर्वच कामगार वर्ग हा बेरोजगार झाला. सुरुवातीला त्यांना वाटले की लॉकडाऊन काही जास्त दिवस राहणार नाही. म्हणून ते जवळपास महीनाभर शांत होते. परंतु हळूहळू लॉकडाऊनचा कालावधी हा वाढतच गेला आणि जवळची सर्व जमापूंजी संपल्यावर कामगारांना घरी बसून राहणे शक्य नव्हते. ज्या भाकरीसाठी ते घरदार सोडून परक्या शहरात वास्तव्यास आले त्याच भाकरीसाठी त्यांना पुन्हा आपापल्या गावी जाणे आवश्यक होते. म्हणून प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था होत नसलेली पाहून घराच्या ओढीनं हा मजूर वर्ग हजारो मैल पायपीट करीत निघाला. उन्हातान्हात उपाशीपोटी लेकरंबाळांना सोबत घेऊन अनवाणी पायानं रस्ता तुडवितांना आपण साऱ्यांनीच त्यांना पाहिलं. देशाचा अर्थ व्यवस्थेचा कणा हा कामगार वर्ग.देशाची उभारणी करणारा हा कामगार वर्ग. मात्र स्वतःचीच उभारणी करण्यात अयशस्वी ठरला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा बहुतांश कामगार वर्ग असंघटित आहे आणि आपल्या हक्क अधिकारांप्रति तो अजूनही अनभिज्ञ आहे. म्हणूनच या कामगार वर्गाचं नेहमीच शोषण होत आलेले आहे.
         अगदी स्वातंत्र्याच्या अगोदरपासून तर आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून जवळपास ७३ वर्षे होऊनही कामगारांचे शोषण अजूनही थांबलेले नाही. संघटित कामगारांची स्थिती थोडीफार बऱ्यापैकी आहे. कारण त्यांच्या कामगार संघटना अस्तित्वात आहेत आणि त्याद्वारे त्यांच्या हक्क अधिकार यांच्याप्रति ते जागृत असतात परंतु भारताने खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्विकारल्याने आज संघटित कामगारांची संख्या फारच कमी आहे. भांडवलदारांनी कंत्राटी पद्धत अंमलात आणल्याने कंत्राटी मजूरांची संख्याच मोठ्या प्रमाणात आहे.कंत्राटी मजूर देखील असंघटित कामगार आहेत.त्यांच्या कामगार संघटना नाहीत. त्यांना संघटित कामगारांच्या मोठ्या संघटनेत सहभागी होता येते. परंतु कारखानमालकाच्या कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने ते संघटनेत सामील होत नाहीत.
       लॉकडाऊनच्या काळात कामगार वर्गाला अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. परंतु या श्रमिकांवर अशी वेळ का आली हे लक्षात घेतले असता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कामगार आणि कामगार चळवळीसंबंधीचे विचार आजही महत्त्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब असे म्हणतात की, "ज्याच्याजवळ सत्ता असते त्यालाच स्वातंत्र्य असते.हा सिद्धांत कोणीही नाकारु शकत नाही. स्वातंत्र्य मिळविण्याचे आणि सर्व अडचणींतून मुक्त होण्याचे एकमेव साधन सत्ता हेच असून धार्मिक व आर्थिक शक्तीइतकी नसली तरी राजकीय शक्तीही खरीखुरी शक्ती असून बरीच परिणामकारकही आहे. कारण शोषित पिडीत वर्गाला नवीन घटनेप्रमाणे जे राजकीय हक्क मिळाले आहेत ते आपल्या शत्रूंनी आपल्या यंत्रणेद्वारा आणि आपल्यातील स्वार्थी, गरजू आणि दुराचारी लोकांच्या साहाय्याने कूचकामी करुन टाकले आहेत." डॉ.बाबासाहेबांच्या मतानुसार कामगार वर्गाकडे राजकीय सत्ता असणे आवश्यक आहे. शोषित पिडीत वर्गाचे प्रतिनिधी अर्थातच कामगार वर्गाचे प्रतिनिधी संसदेत जाणे आवश्यक आहे.जेणेकरुन ते प्रतिनिधी आपल्या कामगार वर्गाच्या समस्या, प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडू शकतील.
          डॉ.बाबासाहेब असे म्हणतात की,"माझ्या मते या देशातील कामगारांना दोन शत्रूंशी तोंड द्यावे लागते.हे दोन शत्रू म्हणजे : ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे होत.ब्राम्हणशाही या शब्दाचा स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वांचा अभाव असा अर्थ मला अभिप्रेत आहे." डॉ. बाबासाहेबांच्या या मताच्या अनुषंगाने विचार केला असता तर आजही हीच खरी परिस्थिती आहे. कारण संसदेत जे लोक आहेत ते जास्तीत जास्त ब्राह्मणवादी विचाराने ग्रस्त असून भांडवलशाहीचे पोषण करणारे आहेत. म्हणूनच कामगार वर्गास अत्यंत वाईट परिस्थितीत जीवन जगणं भाग पडत असतांना सुद्धा संसदेत एस.सी,एस.टी.,आणि ओ.बी.सी. वर्गाचे प्रतिनिधी असतांना सुद्धा कामगारांच्या हितासाठी कुणीही आवाज उठविलेला दिसून येत नाही.डॉ. बाबासाहेब प्रचार-प्रसार माध्यमांचं महत्त्व अधोरेखित करतांना असे म्हणतात की,आपल्या कामगार चळवळीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एखादे प्रभावी दैनिक वर्तमानपत्र पाहिजे. आजही आपण जर याचा विचार केला तर कामगार, शोषित-पिडीत यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला समाजासमोर आणणारे प्रभावी असे दैनिक वर्तमानपत्र नाही. प्रचार प्रसार माध्यमे ही सरकारची आणि भांडवलशाहीची बटीक झालेली दिसून येतात. त्यामुळे कामगार वर्गाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे.
       कामगार ऐक्याच्या बाबतीत डॉ.बाबासाहेब असं म्हणतात की,"सामाजिक दृष्टीने उच्च नीच भेदभाव मानणे व पाळणे हे तत्वतः चूक असून कामगारांच्या संघटनेला ते फार घातक आहे, हे कामगारांना सांगणे तसेच वंश आणि धर्मामुळे एक कामगार दुसऱ्याचा शत्रू बनत असल्यामुळे कामगारांच्या ऐक्यामध्ये आड येणारी ही कारणे नष्ट करणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय." वर्तमानस्थितीत कामगारांच्या समस्या आणि प्रश्नांच्या बाबतीत सरकार उदासीन दिसून येते याचे महत्त्वाचे कारण हेच आहे की, कामगार हे संघटित नाहीत. जाती धर्माच्या आधारे ते अजूनही विखुरलेले आहेत. त्यांच्यामध्ये एकीची भावना नाही.कामगार वर्ग म्हणून ते एकत्र यायला मानसिकरित्या तयार नाहीत. जोपर्यंत ते कामगारवर्ग म्हणून संघटित होऊन त्यांच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढा देत नाहीत तोपर्यंत त्यांची दखल कुणीही घेणार नाही.म्हणून सर्व शोषित पिडित कामगारांनी संघटित होऊन कामगारांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून प्रसंगी कामगारांच्या हितासाठी जाबही विचारणे आवश्यक आहे.
        कामगारांच्या दुर्व्यवस्थेला कामगार संघटना आणि त्यांचे नेतृत्व सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे. कारण डॉ.बाबासाहेब असे म्हणतात की, "कामगार वर्गाच्या जीवनस्तराचे कमी होण्यापासून संरक्षण करणे हा कामगार संघटनांचा मुख्य उद्देश आहे."हा उद्देश पाहता आजच्या घडीला कामगार संघटना ह्या कामगार वर्गाचे जीवनस्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत नाहीत. कामगार संघटनेचे नेतृत्व सुद्धा फक्त पदासाठी आपसांत संघर्ष करतांना दिसून येतात. काही प्रसंगी भांडवलशाहीशी हातमिळवणी करण्यात देखील ते मागेपुढे पाहत नाहीत.कामगार संघटनेचे नेतृत्व हे स्वार्थी आणि पथभ्रष्ट असेल तर कामगारांच्या प्रश्नांकडे, त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणूनच कामगारांची स्वतंत्र आणि संघटित अशी स्वावलंबी संघटना असणे आवश्यक आहे. ब्राम्हणशाहीने ग्रस्त आणि वर्चस्ववादी प्रवृत्तीचे नेतृत्व कामगारांना न्याय मिळवून देण्यास कधीच सक्षम असणार नाही.म्हणूनच कामगार संघटनेचे नेतृत्व हे शोषित पिडितांच्या दुःखाची जाण असलेल्या व्यक्तींकडेच असले पाहिजे. जेणेकरुन ते कामगारांच्या न्याय हक्काची लढाई सक्षमपणे लढू शकतात.
         डॉ.बाबासाहेबांच्या मते देशातील ८०% शोषित पिडीत लोकांवरील होणारा जुलूम समूळ नष्ट करुन त्यांचे जीवन सुखाचे करणे, हेच खरे राजकारण होय आणि ज्या राजवटीत शेतकरी, मजूरांस पिळणारे शेठसावकार यांचे प्राबल्य असते ती राजवट देशाचे खरे हित कधीच साधू शकणार नाही.जर आज भारतात खरोखर शोषित-पिडीत,शेतकरी आणि कामगारांचे हित पाहणारे सरकार राहिले असते तर त्यांच्याशी असा भेदभावाचा व्यवहार झाला नसता.म्हणूनच डॉ.बाबासाहेब कामगारांना राजकीय सत्ता हाती घेण्याचे आवाहन करतात. ते म्हणतात की, "कामगारांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याची जर संघटितपणे शपथ घेतली तर त्यांना तो एक अभिशापच ठरेल." जी राजकीय संस्था शेठसावकार आणि भांडवलदारांचे हित साधण्याचा प्रयत्न करते त्या संस्थेपासून नाडलेल्या वर्गाने अलिप्त राहण्याचा इशाराही डॉ. बाबासाहेब देतात. इ.स. १९३८ मध्ये डॉ. बाबासाहेब यांनी दिलेला हा इशारा जर शेतकरी आणि कामगार वर्गाने लक्षात घेतला असता तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची आणि कामगारांना अशाप्रकारे लाचारीने जीवन जगण्याची वेळ आली नसती.
       अध्ययनाचे महत्त्व विषद करतांना डॉ. बाबासाहेब श्रमिकांना म्हणतात की, "ज्ञानाशिवाय अधिकार मिळत नाहीत. भांडवलशाहीला मुक्त हस्त देणाऱ्या सरकारपेक्षा नियंत्रणाखाली असलेल्या यंत्रणेला ज्ञानाची अत्युच्च पातळी व प्रशिक्षण मिळवावे लागेल. दुर्दैवाने भारतातील श्रमिकांनी अध्ययनाचे महत्त्व जाणले नाही. एक श्रमिक नेता म्हणून भांडवलदारांना शिवीगाळ करणे आणि अधिकाधिक शिवीगाळ करणे हीच सुरुवातीपासून श्रमिक नेत्यांची भूमिका राहिली आहे.डॉ. बाबसाहेबांच्या या विचारानुसार आपणास असे लक्षात येते की,कामगारांच्या हक्क अधिकारासाठी लढा लढतांना कामगार नेत्यांना जगातील कामगार चळवळींचा अभ्यास असणे आवश्यक आहे. कामगारांचे मूलभूत हक्क अधिकार आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेची जाणही नेतृत्वाला असणे आवश्यक आहे.
        वर्तमान स्थितीत कामगारांचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते जर सोडवायचे असतील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार आणि कामगार चळवळ या संदर्भात जे महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत त्या विचारांचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करून त्यादृष्टीने पावले उचलणे ही काळाची गरज आहे. अन्यथा कामगार वर्गाला अशाचप्रकारे शोषणाच्या व्यवस्थेला सामोरं जावं लागेल. म्हणून ही शोषणाची व्यवस्था उखडून फेकायची असेल तर कामगार वर्ग म्हणून एकत्र येऊन संघटितपणे लढा दिल्याशिवाय पर्याय नाही.


प्रणाली मराठे- धुळे.
9970955255
संदर्भ - कामगार चळवळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे व लेख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...